Monday, July 14, 2014

३. शिवमानसपूजा स्तोत्र [शंकराचार्यकृत]

[सकाळी पूजा करताना हे स्तोत्र म्हणतात]

रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् |
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ||

हे दयेचा सागर असलेल्या; प्राणिमात्रांचा स्वामी असलेल्या; भगवान शंकरा; मनानी [मी तुला बसण्यासाठी] रत्नांच आसन ठेवलेलं आहे; शीतल भरपूर पाण्यानी स्नान घालत आहे; रत्ने जडवलेली सुंदर वस्त्रे नेसवत आहे; कस्तुरी बरोबर गन्ध उगाळून ते लावत आहे; बेलाची त्रिदळ; जाई चाफा अशी फुलं वहात आहे; व उदबत्तीने आणि दिव्याने ओवाळत आहे. [ मनानी आपण या क्रिया कराव्या] त्याचा स्वीकार कर.

सौवर्णे नवरत्नखण्डखचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् |
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ||

नवरत्न जडवलेल्या पात्रात तूप; खीर; दूध; दह्याचा नैवेद्य मनानी अर्पण केला आहे. [भक्ष्य; लेह्य; चोष्य; भोज्य; पेय असे] पाच प्रकारचे [अन्न] पदार्थ; विविध प्रकारच्या भाज्या वाढल्या आहेत. केळ; सरबत चवदार कापरासारखं स्वच्छ असं पाणी वाढलेलं आहे. विडा ठेवलेला आहे. हे परमेश्वरा; मी हे सर्व भक्तिपूर्वक केले आहे तरी तू याचा स्वीकार कर.

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरीमृदुङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा |
साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिः बहुविधा ह्येतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ||


[तुला मस्तकावर] छत्र [धरलं]; चवऱ्या ढाळल्या; पंख्यानी [वारा घातला नंतर] स्वच्छ आरशात [मुख दाखवलं] वीणा भेरी वगैरे वाद्यांचा सुंदर नाद केला; तुझ्या भक्तीपर गाणं गाईल तसच नृत्य केलं साष्टांग नमस्कार केला; बरीच स्तोत्र पठण केली  या सर्व गोष्टी मी मनातल्या मनात  करून तुला भक्तीभावानी अर्पण केल्या आहेत, तरी हे परमेश्वरा तू या पूजेचा स्वीकार कर.

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः |
संचारः पदयोः प्रदक्षणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ||

[माझ्या देहातील] आत्मा तूच आहेस; बुद्धी ही देवी पार्वती आहे. प्राण म्हणजे गण; शरीर हे तुझंच मंदिर आहे. [मी] जे वेगवेगळे उपभोग घेतो ते [आत्मा तूच असल्यामुळे तुलाच ते अर्पण होऊन ती] तुझी पूजाच असते. झोप म्हणजे समाधि, मी जे चालतो ती प्रदक्षिणा, जे बोलतो ते सर्व तुझी स्तोत्रच. हे शंकरा माझं प्रत्येक कृत्य ते सर्व  तुझी पूजा आहे.

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् | 
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ||

हात; पाय; वाणी; शरीर; कान आणि डोळे किंवा मनानी ज्या काय चुका मी केल्या असतील; [जे  करायला पाहिजे] ते राहील असेल किंवा नको असलेल केलं असेल त्याबद्दल; हे दयेचा सागर असणाऱ्या महादेवा; भगवान शंकरा; तू मला क्षमा कर.

Monday, September 30, 2013

२. अन्नपूर्णा स्तोत्रम् - नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी

नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी निर्धूताखिललोकपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी | प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुरीधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥

[हे आई अन्नपूर्णा देवी; तू भक्तांना] नित्य आनंद प्रदान करतेस; निर्भयतेचा वर देतेस; सौंदर्य [अन्त:करणाचं आणि देहाचं] यांचा तू खजिना आहेस; तू सर्वांचे [त्रिविध ताप]; पापे यांचा नाश करून त्यांना पवित्र करतेस; काशीत प्रत्यक्ष वास्तव्य करतेस; हिमालयाचा वंश पावन केला आहेस; वाराणसीची अधिष्ठात्री देवता आहेस; हे आई; तुझ्या कृपेचा वर्षाव करून तू [ज्ञानाची] भिक्षा [मला] घाल.

नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी मुक्ताहारविलम्बमानविलसद्क्षोजकुम्भान्तरी | काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥
हे आई; तू विविध रंगाच्या रत्नांचे अलंकार परिधान केले आहेस; सुवर्णाचे वस्त्र परिधान केल्यामुळे तू अतिशय सुंदर दिसत आहेस; तुझ्या उरोजांच्या मध्यावर लांब मोत्यांचा हर शोभून दिसत आहे; काश्मिरातील अगरू या सुगंधी उटण्याचा लेप केल्यामुळे फार सुंदर दिसत आहेस; हे वाराणसीच्या अधिष्ठात्री देवते मला [ज्ञानाची] भिक्षा घाल.

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी | सर्वैश्वर्यसमस्तवाञ्छितकरी काशीपुरीधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥

[त्या माता अन्नपूर्णेला माझा नमस्कार की जी जीव आणि शिवाची] भेट घालून पूर्णानन्दाचा लाभ करून देते; [षड्] रिपूंचा नाश करते; [नैतिक आणि] धार्मिक बंधने पाळून मिळेल तेवढी संपत्ती मिळवावी अशी निष्ठा निर्माण करते; चन्द्र; सूर्य आणि अग्नि यांच्या तेजाप्रमाणे तेजाची जणू काही लाटच आहे; सर्व विश्वाचं रक्षण करते; सर्व समृद्धी प्रदान करते; सर्व इच्छा पूर्ण करते; अत्यंत कृपाळू अशी आहे [हे अन्नपूर्णा माते  मला ज्ञानाची] भिक्षा घाल.

कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी |
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥

[त्या आई अन्नपूर्णेला माझा नमस्कार की] जिने कैलास पर्वतावरील गुहेत निवास केला आहे; जिची गौरी; उमा; शंकरी; कौमारी अशी विविध नावे आहेत; जी [आपल्या भक्तांना] वेदांचा अर्थ सखोलपणे स्पष्ट करून सांगते; ओंङ्कारचं बीज हे जीच स्वरूप आहे; मोक्षाचे [बंद] दरवाजे जी सताड उघडते; वाराणसीची अधिष्ठात्री देवता आहे; [अश्या] हे अन्नपूर्णा माते मला [ज्ञानाची] भिक्षा घाल.

दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी | श्रीविश्वेशमनःप्रसाधनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥

परमेश्वर स्वरूपाच्या दृश्य आणि अदृश्य विभूती [तुझ्या उदरामध्ये तू] धारण करतेस; सम्पूर्ण विश्वाला तू तुझ्या उदरात तू सामावून घेतेस; या जगतातल्या घटनांच्या लीलानाट्याची सर्व सत्ता तुझ्या हातात आहे; [भक्ताच्या अन्तःकरणात आत्म] ज्ञान रूपी दिवा तुझ्यामुळे प्रज्वलित होतो; परमेश्वरी कृपेचा लोट तुझ्यामुळे [योग्याच्या] अंतःकरणात उसळतो; वाराणसीची तू अधिष्ठात्री देवता आहेस [तुला माझा नमस्कार] हे अन्नपूर्णा माते; मला [ज्ञान आणि वैराग्य यांची] भिक्षा घाल.

उर्वीसर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी | 
सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥

त्या अन्नपूर्णा मातेला माझा नमस्कार की पृथ्वी माता असल्यामुळे सर्वच जण त्या देवीला मान देतात; अश्तैश्वर्यसंपन्न आहे; तिचे काळेभोर केसांची सुंदर वेणी घातलेली आहे; [पृथ्वीमाता असल्याने] सतत अन्नदान करते; तिच्या लेकरांना नेहमी सुखात ठेवते; कल्याणकारक आहे; अशा हे वाराणसीच्या अधिष्ठात्री देवता असलेल्या अन्नपूर्णा माते मला [ज्ञान आणि वैराग्याची] भिक्षा घाल.

आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी काश्मीरात्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्याङ्कुरा शर्वरी|
कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥

त्या अन्नपूर्णा मातेला माझा नमस्कार की अपासून तर क्ष पर्यंत सर्व अक्षरांची निर्मिती जिनी स्वतः मधूनच केली आहे; [सर्व ज्ञानाच मूल स्वरूप तीच आहे] परम तत्वाच्या तिन्ही भावांची, [सत्व  रज आणि तमस] तीच जननी आहे; तिन्ही शक्ती [इच्छा; ज्ञान आणि कृती] यांच्यावर तिचा ताबा आहे; सर्व स्फुरण [नवनिर्मिती] तीच घडवते; भक्तांच्या इच्छा पूर्ण करते [धरतीस्वरूप असल्याने] सर्वांचे भरण पोषण करते.

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी वामं स्वादुपयोधरप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी | 
भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी  ॥८॥

[त्या अन्नपूर्णा मातेला माझा नमस्कार की] विविध प्रकारची  रत्ने जीने परिधान केली आहेत; सुंदर अशी  दक्षकन्या; जिच्या डाव्या हातात दुधाची वाटी आहे अशी; [पूर्णान्नाचं प्रतिक म्हणून  दुध; ती आपल्या लेकरांना देते ] ही श्रेष्ठ देवी  भक्तांच ईप्सित पूर्ण करते; नेहमी हिताचा वर्षाव करते.

चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी चन्द्रार्काग्निसमानकुन्तलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी | मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥९॥

त्या अन्नपूर्णा मातेला माझा नमस्कार की कोट्यावधी सूर्य; चन्द्र आणि अग्नि याचं तेज जिनी धारण केलं आहे; जिचे तांबूस ओठ चंद्राच्या किरणांप्रमाणे [अमृत स्रवणारे;] तेजस्वी आहेत; जिचे केस चन्द्र; सूर्य आणि अग्नि यांप्रमाणे [अग्निच पावित्र्य आणि तेज] यांनी युक्त आहेत; जिचा रंग चन्द्र [शीतलता;सौंदर्य] आणि सूर्य [तेज] यांप्रमाणे आहे; जिच्या हातात जपमाला; पुस्तक; पाश आणि अंकुश आहेत अशी ही वाराणसी नगरीची अधिष्ठात्री देवता आहे.

क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरश्रीधरी | 
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥

त्या अन्नपूर्णा मातेला माझा नमस्कार की जी राजांचे हि रक्षण करते; [भक्तांना] पूर्ण निर्भयता प्राप्त करून देत; जी जणू दयेचा सागरच आहे; ती प्रत्यक्ष मोक्ष मिळवून देते; सतत कल्याणकारी आहे; प्रत्यक्ष भगवान शंकराची समृद्धी तीच करत; दक्षाला [अहंकाराला; प्रत्यक्ष पित्याला] ती रडवते [आणि सुधारून] त्याला चांगल्या स्थितीत आणते; कृपाप्रसाद देते अशी ही वाराणसी नगरीची अधिष्ठात्री देवता आहे.

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे | 
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥११॥

हे भगवान शंकराला प्राणप्रिय अशा; [भक्तांना वर देण्यास] नेहमी तयार असलेल्या पार्वती; अन्नपूर्णा देवी माझ ज्ञान आणि वैराग्य परिपूर्ण होईल, अशी भिक्षा मला घाल.
 
माता च पार्वतीदेवी पिता देवो  महेश्वरः |
बान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥१२॥
जगदंबा पार्वती देवी हीच माझी आई आणि भगवान शंकर माझा पिता आहे. शिवभक्त हे माझे बान्धव होत. हे सर्व त्रैलोक्य हाच  माझा देश आहे.

Saturday, September 14, 2013

१. गणेशपञ्चरत्नम् - मुदाकरात्तमोदकं

मुदाकरात्तमोदकं सदाविमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरञ्जकम् |
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ॥१॥

ज्यानी [हातात] मोदक घेतला आहे, अशा आनंददायी; [भक्तांना] नेहमी मोक्ष प्रदान करणाऱ्या; भाळावर चन्द्र धारण करणाऱ्या; दृश्य अशा जगाला आनंदित करणाऱ्या; [जर] बजबजपुरी माजली तर त्यावर जो एकटाच काबू ठेवू शकतो अशा; इभ नावाच्या राक्षसाचा नाश करणाऱ्या; भक्तांची संकटे लगेच नाहीशी करणाऱ्या; गणेशाला मी प्रणाम करतो.

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् |
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ॥२॥

[त्याचे] भक्त नसणाऱ्याना ज्याची फार भीती वाटते अशा; उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी अशा; राक्षस सुद्धा  वंदन करतात त्या देवाला; भक्तांची संकटे दूर करणाऱ्या  [विद्येचा] खजिन्याचा स्वामी असणाऱ्या; गणांचा नायक असणाऱ्या; सर्वश्रेष्ठ देवाधीदेवाचा मी सतत आसरा घेतो.

समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् |
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं  मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ॥३॥

सम्पूर्ण विश्वाला कल्याणकारक अशा; अतिशय सामर्थ्यवान राक्षसाचा नाश करणाऱ्या; विशाल उदार असणाऱ्या; श्रेष्ठ अशा गजाच मुख असणाऱ्या; कृपाळू; क्षमाशील; आनंददायी; कीर्ति प्रदान करणाऱ्या; भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या; सर्वश्रेष्ठ; तेजस्वी [गणेशाला] मी प्रणाम करतो.

अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम् | 
प्रपञ्चनाशभीषणं  धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ॥४॥

जो निराश्रितांची दु:खे दूर करतो; [पूर्वसुरीनी] ज्याच नेहमी गुणगान केलं आहे अशा; त्रिपुरारीचा [भगवान शंकराचा] थोरला पुत्र असलेल्या; राक्षसांचा गर्व नाहीसा करतो अशा; मायेचा नाश करण्याची प्रचंड शक्ती असणाऱ्या पंचमहाभूतांच भूषण असणाऱ्या; लावण्याची परिसीमा ज्याच्या कपोलावर दिसते अशा; पुराणांमध्ये ज्याची फार स्तुती वर्णिली असते अशा [गणेशाची] मी भक्ती करतो.

नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजमचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकृन्तनम् | 
हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् ॥५॥
ज्याच्या दाताची शोभा अतिसुंदर आहे अशा; यमाचा नाश करणारा [देव शंकर] ज्याचा पिता आहे अशा; ज्याच्या स्वरुपाबद्दल कोणाला [पूर्णपणे] समजत नाही अशा [ज्याचा थांग लागत नाही अशा] सर्वव्यापी; भक्तांचे [सर्व] अडथळे दूर करणाऱ्या; योग्यांच्या अन्त:करणात सतत वास करणाऱ्या; एकदंत अशा श्रीगणेशाच मी सतत ध्यान करतो. 

महागणेशपञ्चरत्नमादरेण योऽन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन्गणेश्वरम् | 
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात् ॥६॥

जो मनात श्रीगणेशाचं ध्यान [चिंतन] करीत पहाटे आदरपूर्वक हे रत्नाप्रमाणे असलेलं महागणपतीच स्तोत्र पठण करेल तो तंदुरुस्त राहील; पापांचा नाश होईल; चांगला जोडीदार आणि सुपुत्र मिळेल; लवकरच त्याला अष्ट सिद्धी प्राप्त होऊन दीर्घायुष्य मिळेल.