Monday, July 14, 2014

३. शिवमानसपूजा स्तोत्र [शंकराचार्यकृत]

[सकाळी पूजा करताना हे स्तोत्र म्हणतात]

रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् |
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ||

हे दयेचा सागर असलेल्या; प्राणिमात्रांचा स्वामी असलेल्या; भगवान शंकरा; मनानी [मी तुला बसण्यासाठी] रत्नांच आसन ठेवलेलं आहे; शीतल भरपूर पाण्यानी स्नान घालत आहे; रत्ने जडवलेली सुंदर वस्त्रे नेसवत आहे; कस्तुरी बरोबर गन्ध उगाळून ते लावत आहे; बेलाची त्रिदळ; जाई चाफा अशी फुलं वहात आहे; व उदबत्तीने आणि दिव्याने ओवाळत आहे. [ मनानी आपण या क्रिया कराव्या] त्याचा स्वीकार कर.

सौवर्णे नवरत्नखण्डखचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् |
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ||

नवरत्न जडवलेल्या पात्रात तूप; खीर; दूध; दह्याचा नैवेद्य मनानी अर्पण केला आहे. [भक्ष्य; लेह्य; चोष्य; भोज्य; पेय असे] पाच प्रकारचे [अन्न] पदार्थ; विविध प्रकारच्या भाज्या वाढल्या आहेत. केळ; सरबत चवदार कापरासारखं स्वच्छ असं पाणी वाढलेलं आहे. विडा ठेवलेला आहे. हे परमेश्वरा; मी हे सर्व भक्तिपूर्वक केले आहे तरी तू याचा स्वीकार कर.

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरीमृदुङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा |
साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिः बहुविधा ह्येतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ||


[तुला मस्तकावर] छत्र [धरलं]; चवऱ्या ढाळल्या; पंख्यानी [वारा घातला नंतर] स्वच्छ आरशात [मुख दाखवलं] वीणा भेरी वगैरे वाद्यांचा सुंदर नाद केला; तुझ्या भक्तीपर गाणं गाईल तसच नृत्य केलं साष्टांग नमस्कार केला; बरीच स्तोत्र पठण केली  या सर्व गोष्टी मी मनातल्या मनात  करून तुला भक्तीभावानी अर्पण केल्या आहेत, तरी हे परमेश्वरा तू या पूजेचा स्वीकार कर.

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः |
संचारः पदयोः प्रदक्षणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ||

[माझ्या देहातील] आत्मा तूच आहेस; बुद्धी ही देवी पार्वती आहे. प्राण म्हणजे गण; शरीर हे तुझंच मंदिर आहे. [मी] जे वेगवेगळे उपभोग घेतो ते [आत्मा तूच असल्यामुळे तुलाच ते अर्पण होऊन ती] तुझी पूजाच असते. झोप म्हणजे समाधि, मी जे चालतो ती प्रदक्षिणा, जे बोलतो ते सर्व तुझी स्तोत्रच. हे शंकरा माझं प्रत्येक कृत्य ते सर्व  तुझी पूजा आहे.

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् | 
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ||

हात; पाय; वाणी; शरीर; कान आणि डोळे किंवा मनानी ज्या काय चुका मी केल्या असतील; [जे  करायला पाहिजे] ते राहील असेल किंवा नको असलेल केलं असेल त्याबद्दल; हे दयेचा सागर असणाऱ्या महादेवा; भगवान शंकरा; तू मला क्षमा कर.